परंडा: परंडा तालुक्यातील आंदोरी शिवारात शनिवारी (दि. २५ नोव्हेंबर) शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील व्यक्ती जखमी झाल्या असून परंडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, आरोपी ईश्वर श्रीमंत उमाप, ज्ञानदेव श्रीमंत उमाप आणि पाच अनोळखी इसमांनी रामहरी सोपान पिंगळे (वय ७५, रा. आरणगाव) यांना शेतीच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११९(१), १८९(२), १९१(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत, रामहरी सोपान पिंगळे आणि इतर तीन जणांनी अदित्य ईश्वर उमाप (वय २०, रा. आंदोरी) यांना मागील भांडणाचे कारण दाखवून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अदित्य उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे . पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.