परंडा: गावातील मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून परंडा शहरातील आयटीआय कॉलेजसमोर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार जालिंदर मुरकुटे (वय १६, रा. सोनारी, ता. परंडा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास परंडा येथील आयटीआय कॉलेजसमोर घडली.
आरोपी चैतन्य शेळके, शंभु थिटे आणि गणेश नलवडे (सर्व रा. भोत्रा, ता. परंडा) यांनी तुषार याला अडवले. गावातील मुलांसोबत झालेल्या अज्ञात कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, त्यांनी तुषारला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर २३ ऑगस्ट रोजी तुषार मुरकुटे यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि भारतीय हत्यार कायद्याच्या (आर्म्स ॲक्ट) कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. किरकोळ वादातून महाविद्यालयीन तरुणांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.