परंडा : शहरात मध्यरात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तीन संशयित तरुणांना परंडा पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा घडण्यापूर्वीच संभाव्य डाव उधळला गेला. ही घटना शुक्रवारी, १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ढगे पिंपरी येथे घडली.
परंडा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना, ढगे पिंपरी येथील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या भिमा दाजी कुंभार यांच्या घराच्या आडोशाला अंधारात तीन जण लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाला त्यांचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्या तिघांना हटकले.
पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सोनु संजिवन चौतमहल (वय २१, रा. कवठे भिमनगर, परंडा), तौफिक इस्माईल शेख (वय २५, रा. नगरपालिका पाठीमागे, परंडा) आणि साहिल रवि गायकवाड (वय १८, रा. देहूरोड, पुणे) असे सांगितले. इतक्या रात्री अवेळी येथे काय करत आहात, असे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यांच्या संशयास्पद वागण्यामुळे आणि असमाधानकारक उत्तरांमुळे, ते मालमत्तेविरोधात गुन्हा करण्याच्या उद्देशानेच त्या ठिकाणी दबा धरून बसले असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ तिघांनाही ताब्यात घेतले.
याप्रकरणी, पोलीस सरकारतर्फे फिर्यादी झाले असून, तिन्ही तरुणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.