धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सगळीकडे “पिपाणी वाजली” अशी चर्चा रंगली! पण या पिपाणीच्या नादात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे मात्र धक्का खाऊन बसले. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 1,509 मतांनी विजय मिळवत परंड्यातील राजकीय व्यासपीठावर आपला डंका वाजवला.
सावंत यांना मिळाली तब्बल 1,03,254 मते, तर मोटे यांना 1,01,745 मते. इथपर्यंत ठीक होतं, पण खरी गंमत अपक्ष उमेदवार जमीलखान महेबूब पठाण यांनी घडवली. मोटे यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तर पठाण यांचे निवडणूक चिन्ह ट्रम्पेट म्हणजे पिपाणी ! पण या दुसऱ्या पिपाणीवर तब्बल 4,446 मतं मिळाली आणि राहुल मोटे यांचा “तुतारीचा सूर” चक्क बेसूर झाला.
निवडणूक मतमोजणीच्या वेळी पिपाणीच्या चिन्हाने मतदारांचा घोळ उडवला. “ही पिपाणी कुणाची?” असा प्रश्न मोजणी केंद्रावर अनेकांना पडला होता. अखेर पिपाणीच्या गोंधळात मोटे यांची ‘तुतारीची हवा’च गेली, आणि सावंत यांनी विजयाचा झेंडा फडकावला.
राजकीय गमतीतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली – निवडणुकीत फक्त उमेदवारांचीच नाही, तर चिन्हांचीही जादू चालते! परंड्यात पिपाणीमुळे तुतारी वाजली, पण ती फक्त सावंतांच्या विजयाची!
परंड्यात पिपाणीचा गोंधळ: तुतारीचे सूर बेसूर!
परंडा मतदारसंघातील निवडणूक म्हणजे जणू राजकीय तमाशाच ठरली! या तमाशात ‘तुतारी‘ आणि ‘पिपाणी‘ या दोन वाद्यांमध्ये झालेला गोंधळ लोकांना अजूनही विसरता येत नाही. तानाजी सावंतांच्या धनुष्यबाणाने विजय मिळवला खरा, पण या लढाईत तुतारी हरवली, ती पिपाणीच्या एका ‘चुकार सूर’मुळे!
सुरुवात अशी झाली की, शिवसेनेचे तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) मोटे यांच्या तुतारीत चांगलीच स्पर्धा रंगली होती. सगळं निवडणूक चक्र व्यवस्थित चालू होतं, पण या सर्कशीत एक अनपेक्षित वादक म्हणजे जमीलखान मेहेबूब पठाण यांच्या ‘पिपाणी’ने चमत्कार घडवला! पठाणसाहेब स्वतः निवडून येतील, असं स्वप्न पाहात नव्हते; पण पिपाणी वाजवून गोंधळ घालायचा, हे त्यांनी ठरवलं होतं.
मतदानाच्या दिवशी मतदार कॅबिनमध्ये गेले, मशीनवरच्या चिन्हांकडे पाहिलं, आणि गोंधळाची सुरूवात झाली. तुतारी आणि पिपाणी यांचा इतका भयानक गोंधळ उडाला की लोकांना कळेचना कुठचं बटन दाबायचं. काहींनी तुतारी समजून पिपाणीचं बटन दाबलं, तर काहींना पिपाणीच तुतारीसारखी वाटली. एक तर लोकांनी आधीच उमेदवारांच्या नावाऐवजी चिन्हांवर मतदान करण्याची सवय लावून घेतली होती, आणि तिथेच सगळं कडबोळं झालं!
आता पिपाणीचे पठाणसाहेब स्वतःही गोंधळले. त्यांना जेव्हा निकाल समजला, तेव्हा ते म्हणाले, “माझा उद्देश जिंकालाच नव्हता, पण लोकांना माझी पिपाणी तुतारीपेक्षा जास्त आवडली, याचा मला आनंद आहे!” त्यांच्या या विधानाने पत्रकार परिषदेत हशा पिकला.
दुसरीकडे, मोटेसाहेब चांगलेच दुखावले. “ही निवडणूक नाही, हे पिपाणी-तुतारी युद्ध होतं,” असं म्हणत ते सावंतांवर बरसले. सावंत मात्र विजयानंतर शांतपणे हसत म्हणाले, “तुमचं तुतारीचं राजकारण आमचं धनुष्यबाण सहन करू शकतं, पण पिपाणीचं काय करायचं?!”
परंड्यातील मतदारही निकालानंतर गमतीने म्हणत होते, “पिपाणीचं ‘डू डू’ ऐकून तुतारीचा ‘ताता राता’ बेसूर झाला.”
शेवट: धडा काय?
या निवडणुकीने परंड्याला एक गोष्ट शिकवली – पुढच्या वेळी चिन्हं निवडताना वाद्यं निवडायची नाहीत! कारण कोणते सूर कधी बेसूर होतील, हे सांगता येत नाही! 😄
– बोरूबहाद्दर