परंडा – चारित्र्यावर संशय घेऊन सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. रुपाली विकास होरे असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी त्यांचे पती विकास हरिदास होरे यांच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली विकास होरे (वय २७ वर्षे, रा. पिंपळवाडी, ता. परंडा) यांनी दिनांक ०९ मे २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत रुपाली यांचे वडील दत्तात्रय निवृत्ती शेळके (वय ५६ वर्षे, रा. गोरमाळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी याबाबत परंडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी पती विकास हरिदास होरे हा मृत रुपाली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयावरून तो रुपाली यांना सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता व त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पतीकडून होणाऱ्या या सततच्या त्रासाला कंटाळून रुपाली यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दत्तात्रय शेळके यांनी दिनांक १४ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी आरोपी पती विकास हरिदास होरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.