परंडा जनावरांची वाहतूक करणारी गाडी पकडून दिल्याचा राग मनात धरून चार जणांच्या टोळक्याने एका २२ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत दगड, काठी आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची घटना परंडा-वारदवाडी रस्त्यावर घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या इतरांनाही या टोळक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी विजय दत्तात्रय पोकळे (वय २२, रा. शेंद्री, ता. बार्शी) यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जुलै २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हॉटेल मायर बिअर बारसमोर घडली. फिर्यादी विजय पोकळे यांना आरोपी फिरोज आयुब पठाण (रा. धाराशिव), शौकत तुराबशा शेख (रा. लातूर, ह.मु. धाराशिव) आणि त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांनी अडवले.
“तुम्ही आमच्या जनावरांच्या गाड्या पकडून का देता?” असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दगड, काठी, व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले.
यावेळी भांडणाचा आवाज ऐकून खंडू जाधव, परमेश्वर राऊत आणि विराज सोले हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, “यापुढे जनावरांच्या गाड्या आडवल्या तर जीवे ठार मारू,” अशी धमकी दिली.
या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी १६ जुलै रोजी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.