परंडा: शहरातील शिंदे कॉलेजसमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २७ वर्षीय तरुणावर सात जणांनी मिळून कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य पांडुरंग शेळके (वय २७, रा. भोत्रा, ता. परंडा) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून चैतन्य याला शिंदे कॉलेजसमोर गाठले. त्यांनी चैतन्यला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि कोयत्याने जबर मारहाण केली, ज्यात तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी जखमी चैतन्यचे वडील पांडुरंग रामा शेळके (वय ५२) यांनी २२ ऑगस्ट रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अशोक इटकर, रणजित इटकर, तुषार जालिंदर मुरकुटे, विजय पुरी, सुमित दुबळे (सर्व रा. सोनारी, ता. परंडा), सुभान शेख (रा. आवाटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि आयाज पठाण (रा. परंडा) यांनी हा हल्ला केला.
पांडुरंग शेळके यांच्या फिर्यादीवरून, परंडा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम 109, 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190) जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल आणि भारतीय हत्यार कायद्याच्या (आर्म्स ॲक्ट) कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.