येरमाळा: येरमाळा शिवारातील घाटातून प्रवाशांची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये २0 ग्रॅम सोन्याची चैन, साड्या, कपडे आणि १२,६०० रुपये रोख रक्कम असा एकूण ९७,६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
पृथ्वीराज शिवाजी धुमाळ (वय २४, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि प्रवासी उर्मिला कुंकुलोळ हे स्वारगेट पुणे येथून ट्रेंड टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसने बार्शी ते येरमाळा येत होते. त्यांनी आपली बॅग ट्रॅव्हल्सच्या मागील डिग्गीत ठेवली होती. मात्र, येरमाळा शिवारातील घाटातून जाताना अज्ञात चोरट्याने ही बॅग चोरी केली.
ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १०.३० ते ६ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ४.३० दरम्यान घडली. पृथ्वीराज धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीत घरफोडी, 61,500 रुपयांचा ऐवज चोरीस
वाशी: वाशीत रात्रीच्या वेळी घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजोरा येथील रहिवासी जालींदर गोरख तळेकर (वय ६१) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६१,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
४ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते ५ डिसेंबर रोजी पहाटे ५ या वेळेत ही घटना घडली. चोरट्याने घरातील लोखंडी पेटी फोडून त्यातील सोन्याचे दागिने, दोन साड्या आणि ४,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ६१,५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे.
याप्रकरणी जालींदर तळेकर यांनी ६ डिसेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.