तुळजापूर: तुळजापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या पाठीमागील शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काक्रँबा गावातील अर्जुन आप्पा सुरवसे (वय ३६) यांना चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ते बेपत्ता झाले होते.
सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. बुधवारी दुपारी रुग्णालयाच्या पाठीमागील सोयाबीनच्या शेतात अर्जुन सुरवसे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.