तामलवाडी : सावरगाव-सुरतगाव रस्त्यावर टाटा इंट्रा वाहनातून गोवंश जनावरांची चरबी अवैधपणे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांना तामलवाडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ३०,००० रुपये किमतीची चरबी आणि वाहन असा एकूण ३,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तामलवाडी पोलिसांना माहिती मिळाली की, एमएच १३ डीक्यु ९३६५ या क्रमांकाच्या टाटा इंट्रा व्ही ३० वाहनामधून गोवंश चरबीची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावरगाव ते सुरतगाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून सदर वाहन थांबवले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यात पंधरा-पंधरा लिटरच्या सहा डब्यांमध्ये गोवंश जनावरांची चरबी आढळून आली. ही चरबी कुठेतरी गोवंशीय जनावरांना ठार मारून आणि त्यांची विल्हेवाट लावून विक्रीसाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिसांनी मोसीन महमदअली शेख, आयुब दादु कुरेशी आणि युनुस इमामसाब कलबुर्गी (सर्व रा. सोलापूर) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५), प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५(अ), ९(अ) आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.