लातूर – लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. रोहिणी शिवारातील एका शेतात चालवल्या जाणाऱ्या ड्रग्ज कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल १७ कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मुंबई पोलीस दलातील एक हवालदार असून, त्याच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद केंद्रे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्याची ओळख एका ड्रग्ज तस्कराशी झाली होती. त्या तस्करानेच केंद्रेला ड्रग्ज बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यातून सहज आणि भरपूर पैसा मिळवण्याच्या आमिषाने केंद्रेने काही महिन्यांपूर्वी आपल्या गावी, चाकूर तालुक्यातील रोहिणी शिवारात असलेल्या माळरानावर एका शेडची उभारणी केली. या शेडमध्ये ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि कच्चा माल आणून त्याने ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू केला.
हा अवैध व्यवसाय काही काळ सुरळीत सुरू होता. मात्र, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रमोद केंद्रेच्या या ड्रग्ज कारखान्याची माहिती उघड केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आणि काही काळ पाळत ठेवून अखेर या कारखान्यावर धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधार प्रमोद केंद्रे याच्यासह जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफिक मोमीन या चौघांना अटक केली आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात तयार केलेले ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे १७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्यानेच ड्रग्ज निर्मितीचा कारखाना चालवल्याच्या या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.