धाराशिव: धाराशिव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. मोबीन नवाज शेख (वय 41), असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने एका गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार, त्याचे वडील आणि भावाविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून भावाचे नाव वगळण्यासाठी पोलीस हवालदार मोबीन नवाज शेख याने सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 4 लाख रुपयांवर आली.
तक्रार मिळाल्यानंतर, एसीबीने 17 जून 2025 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान, शेख याने पंचांसमक्ष 4 लाख रुपये लाचेची मागणी मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
सापळा कारवाईदरम्यान, आरोपी लोकसेवकाने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र, आरोपीच्या अंगझडतीमध्ये बुलेटची चावी, पांढरा रुमाल, 8670 रुपये रोख रक्कम (विविध नोटांच्या स्वरूपात) आणि एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन सापडला. हे सर्व साहित्य एसीबीने जप्त केले आहे.
दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी एसीबीचे पथक रवाना झाले असून, पुढील कारवाई सुरू आहे. मोबीन नवाज शेख याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याला अटक करून पुढील तपास केला जाणार आहे. त्याच्या ताब्यात घेतलेल्या मोबाईलचीही तपासणी करण्यात येणार आहे.
या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिवचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, तर सहायक लाच पडताळणी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय वगरे यांनी भूमिका बजावली. या पथकात पो.ना. आशिष पाटील, पो.शि. विशाल डोके आणि पो.शि. सिद्धेश्वर तावसकर यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (लाप्रवि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) आणि पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागरिकांना आवाहन: कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (टोल फ्री क्रमांक: 1064) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.