तुळजापूरच्या पवित्र भूमीत जे घडले, ते केवळ एका सत्कार सोहळ्याचे वादळ नाही, तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या भीषण वास्तवाचे प्रतिबिंब आहे. ड्रग्ज माफिया आणि मटका किंग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या विनोद गंगणे याच्या हस्ते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक आमदार राणा पाटील यांचा सत्कार होणे, हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक नीतिमत्तेला लागलेले ग्रहण आहे. या घटनेने केवळ आमदार राणा पाटील यांच्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेलाही काळिमा फासला आहे.
एकीकडे, धाराशिव जिल्ह्याचा २६८ कोटींचा विकास निधी अडवून ठेवल्याचा ठपका असताना, दुसरीकडे ड्रग्ज माफियाच्या हातचा सत्कार स्वीकारताना आमदार राणा पाटील यांना थोडेही कसे वाटले नाही? ही केवळ राजकीय चूक नाही, तर हे नैतिक अधःपतनाचे लक्षण आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांना अंधारात ठेवले गेले, असा बचाव केला जात असला तरी, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर कोणाच्या हस्ते आपण सन्मान स्वीकारत आहोत, याचे भान नसणे ही अक्षम्य चूक आहे. या घटनेने गंगणेसारख्या समाजविघातक घटकांना राजकीय आश्रय मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
राणा पाटील यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ती चढ-उतारांनी भरलेली आहे. वडील पद्मसिंह पाटील यांचा वारसा घेऊन राजकारणात आलेल्या राणा पाटलांना शरद पवारांनी दोन्ही सभागृहांचे सदस्य नसताना थेट राज्यमंत्रिपद दिले. मात्र, या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, पक्षांतर करूनही त्यांच्या राजकीय भवितव्याला स्थैर्य लाभलेले नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही त्यांच्या पत्नीला, अर्चना पाटील यांना, त्यांचे दीर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून तब्बल सव्वातीन लाख मतांनी दारुण पराभव पत्करावा लागला. यावरून त्यांची मतदारसंघावरील पकड किती ढिली झाली आहे, हेच सिद्ध होते.
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या जोरावर ते विधानसभा निवडणुकीत तरले असले तरी, जिल्हा पातळीवर त्यांचे नेतृत्व कधीच प्रस्थापित होऊ शकले नाही. जिल्ह्यातील चारपैकी दोन जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाने जिंकल्या आहेत, तर परंड्याची जागा जिंकलेले तानाजी सावंत हे त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. तुळजापुरात प्रबळ विरोधी उमेदवार नसल्याने त्यांचा निभाव लागत असला तरी, काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांनी जोर लावल्यास त्यांची राजकीय नौका पुन्हा एकदा गटांगळ्या खाऊ शकते.
सत्कार समारंभाचे हे प्रकरण म्हणजे केवळ एक घटना नाही, तर आमदार पाटील यांच्या ढासळत्या राजकीय आलेखाचा आणि चुकीच्या संगत निवडीचा परिणाम आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी विकासकामांपेक्षा वादग्रस्त व्यक्तींच्या गराड्यात अधिक दिसू लागतो, तेव्हा जनतेने सावध होण्याची गरज असते. भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षानेही अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे, अन्यथा ‘सत्तेची नशा’ ही केवळ नेत्यालाच नाही, तर संपूर्ण पक्षाला आणि समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते, हा इतिहास आहे. तुळजापूरच्या जनतेने आणि राजकीय धुरिणांनी या धोक्याची घंटा वेळीच ओळखून योग्य तो निर्णय घेण्याची हीच वेळ आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह