धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून धाराशिवमध्ये महायुतीत, विशेषतः शिंदे गटात उडालेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेचा (शिंदे गट) ताबा घेतल्याचा आरोप शिवसैनिकांकडून होत असतानाच, आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या गोंधळाचे खापर अखेर अजित पिंगळे यांच्यावर फोडले आहे.
स्वतःची आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांची सुटका करून घेण्यासाठी सरनाईकांनी आता स्थानिक नेत्यावर जबाबदारी ढकलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नेमके प्रकरण काय? (फ्लॅशबॅक)
गेल्या काही दिवसांत धाराशिवमध्ये तिकीट वाटपावरून शिवसैनिकांचा संताप शिगेला पोहोचला होता.
१. राणादादांचे वर्चस्व: शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना (उदा. पूजा शिंदे, नेताजी बोंदर-पाटील) उमेदवारी देण्यात आली.
२. एबी फॉर्मचा घोळ: शिवसेनेचे अधिकृत एबी फॉर्म संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी शिवसैनिकांना देण्याऐवजी थेट भाजप आमदार राणा पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या सुपूर्द केल्याचा गंभीर आरोप झाला.
३. हाणामारी: सुधीर अण्णा पाटील यांच्या घरी कार्यकर्त्यांनी सरनाईक आणि साळवींना घेराव घातला, जिथे शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत प्रसंग ओढवला.
या सर्व प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असतानाच, आता पालकमंत्र्यांनी या ‘स्क्रिप्ट’चा व्हिलन म्हणून अजित पिंगळे यांचे नाव पुढे केले आहे.
कोण आहेत अजित पिंगळे? (ज्यांच्यावर फुटले खापर)
अजित पिंगळे हे नाव धाराशिवच्या राजकारणात ‘निष्ठा’ आणि ‘पक्षबदल’ या दोन्ही टोकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाते.
-
मूळचे शिवसैनिक: अखंड शिवसेनेत असताना ते कळंब तालुकाप्रमुख होते.
-
भाजप प्रवेश: मधल्या काळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
-
घरवापसी (विधानसभा २०२४): २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव-कळंबची जागा महायुतीत शिंदे गटाला सुटली. हे गणित जुळवण्यासाठी पिंगळे यांनी पुन्हा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
-
सध्याची स्थिती: स्थानिक शिवसैनिकांच्या मते, पिंगळे हे “शरीराने शिवसेनेत, पण मनाने भाजपमध्ये (राणादादांसोबत)” आहेत.
‘ट्रोजन हॉर्स’ची भूमिका?
पालकमंत्री सरनाईक यांच्या आरोपांनुसार, शिवसेनेचे तिकीट वाटप आणि एबी फॉर्म राणा पाटलांच्या हातात जाण्यामागे पिंगळे यांचा हात आहे. पिंगळे हे शिंदे गटात असूनही भाजपसाठी ‘ट्रोजन हॉर्स’ (छुपा एजंट) म्हणून काम करत असल्याचा संशय आता बळावला आहे. राणा पाटील यांच्या हातात शिवसेनेची सूत्रे देण्याचे काम पिंगळे यांच्यामार्फत झाल्याचे बोलले जात आहे.
‘निष्ठावंत’ वाऱ्यावर?
पालकमंत्र्यांनी खापर पिंगळेंवर फोडले असले, तरी प्रश्न उरतोच की, संपर्कप्रमुख म्हणून राजन साळवींनी आपली जबाबदारी का झटकली? अखेर, “वरचे नेते नामानिराळे आणि स्थानिक प्यादे बळी,” हा राजकारणाचा जुना नियम धाराशिवमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
आता या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात निष्ठावंत शिवसैनिक मात्र हातात केवळ ‘धनुष्यबाण’ घेऊन उभे आहेत, ज्याची प्रत्यंचा मात्र भाजपच्या हातात आहे!
– बोरूबहाद्दर





