तुळजापूर : तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील १३ आरोपी चार महिने उलटूनही सापडत नसल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्याचा सज्जड अल्टिमेटम दिला आहे. तसेच, जामिनावर बाहेर असलेल्या खऱ्या आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
रविवारी (दि. २०) पालकमंत्री सरनाईक यांनी तुळजाभवानी मंदिर कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक गुप्त बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्री ड्रग्जचे एवढे मोठे नेटवर्क पसरणे ही अत्यंत चिंतेची बाब असून, या प्रकरणाने राज्य आणि देशाचे लक्ष वेधले आहे. “आरोपी देशाबाहेर गेले आहेत का?” असा सवाल उपस्थित करत, ते देशातच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि १५ ऑगस्टपूर्वी त्यांना अटक झालीच पाहिजे, असे ठणकावले.
या बैठकीत पालकमंत्री सरनाईक यांनी काही प्रमुख सूचना दिल्या:
- ड्रग्ज प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये.
- जामीन मिळालेल्या खऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावावा.
- संपूर्ण महाराष्ट्रातून ड्रग्जचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
याचबरोबर, जिल्ह्यातील वाढत्या लाचखोरीच्या प्रकरणांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
नळदुर्ग किल्ल्याला ऊर्जितावस्था देणार
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नळदुर्ग येथील किल्ल्याला भेट दिली. किल्ल्याची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली आणि लवकरच या किल्ल्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा निर्धार केला, यासाठी एक विकास आराखडा तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यात त्यांनी कुटुंबीयांसह तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. आगामी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावा घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.