धाराशिव : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवकरांच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर एक भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. गायकवाड हे बहुजन समाजातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेतात. त्यामुळे, त्यांना जीवे मारण्याचा कट होता का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान संविधानाप्रती बांधिलकी जपत गायकवाड यांनी घेतलेली भूमिका भाजपला खुपत होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच कारणामुळे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सुनियोजित हल्ला घडवून आणला, अशी भावना या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
धाराशिवकरांच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.