पुणे/धाराशिव: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, ही कारवाई धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरातून कोमल धनसिंग काळे या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना, त्यांनी धाराशिव पोलिसांनाही माहिती देऊन सहकार्याची विनंती केली होती.
त्यानुसार, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि सचिन खटके यांच्या नेतृत्वाखालील पथक धाराशिव जिल्ह्यात गस्त घालत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदारामार्फत तुळजापूर येथील सुनील सीताराम भोसले आणि त्याच्या साथीदारांनी पुण्याहून एका मुलीचे अपहरण करून आणल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ तुळजापूर गाठून सुनील भोसले (वय ५१) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपण, शंकर उजण्या पवार आणि शालुबाई प्रकाश काळे या तिघांनी मिळून पुण्याहून मुलीला आणल्याचे सांगितले. तसेच, अपहरण केलेली मुलगी लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे शंकर पवार याच्याकडे असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता हासेगाव येथे जाऊन शंकर उजण्या पवार (वय ४०) आणि शालुबाई प्रकाश काळे (वय ३५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ अपहरण करून आणलेली दोन वर्षीय कोमल सुखरूप आढळून आली.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. आरोपींना आणि मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर आणि चालक महेबुब अरब यांचा समावेश होता. त्यांच्या सतर्कतेमुळे एका चिमुकलीचे प्राण वाचले आणि तिची कुटुंबीयांशी पुन्हा भेट झाली.