धाराशिव – अनेक वर्षांपासून धाराशिवकरांची लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वेगाडीची मागणी होती. हरंगूळ-पुणे ही विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्याने या मागणीला मूर्त रूप आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य धाराशिवकर आणि व्यापारी बांधवांनी या नव्या विशेष रेल्वेगाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. तसेच मोटरमन आणि स्टेशनमास्तरचा बुके देऊन सत्कारही करण्यात आला.
पुण्याहून मंगळवारी सकाळी ठीक सहा वाजता पहिल्या विशेष रेल्वेगाडीचे प्रस्थान झाले. हरंगूळच्या दिशेने निघालेली ही गाडी धाराशिव रेल्वेस्थानकात सकाळी ठीक पावणे आकारा वाजेच्या सुमारास दाखल झाली. रेल्वेगाडी स्थानकात दाखल होताच जोरदार घोषणांसह फुलांचा वर्षाव करीत या विशेष रेल्वेगाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोटरमन गोरे, स्टेशनमास्तर श्री. मिनाजी आणि सुनील मिश्रा यांना बुके देऊन धाराशिवकरांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या विशेष रेल्वेगाडीचा जास्तीत जास्त प्रवासी बांधवांनी लाभ घ्यावा, जेणेकरून दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या गाडीचा प्रतिसाद पाहून या मार्गावर कायमस्वरूपी गाडी सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त होईल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे.
अनेक दिवसापासून मागणी
पुणे – लातूर- पुणे ही इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरु होती, अखेर प्रत्यक्षात काल १० ऑक्टोबरपासून ही इंटरसिटी रेल्वे सुरु होणार झाली आहे.
मराठवाड्यातून पुण्याकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे शिवाय अलीकडे पुण्याची ओळख आयटी हब म्हणून होऊ लागली आहे तसेच पुणे एक महत्त्वाच पर्यटन स्थळ देखील आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील लातूरहून मोठ्या प्रमाणात प्रवासी दररोज पुण्याला येतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी लातूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे.यामुळे पुणे ते लातूर या रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांची कायमच गर्दी पाहायला मिळते.
सध्या लातूरहून पुण्याला जाण्यासाठी बिदर एक्सप्रेस, नांदेड एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेस उपलब्ध आहेत.यापैकी बिदर एक्सप्रेस आणि नांदेड एक्सप्रेस रात्री धावतात तर हैदराबाद एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा धावते तसेच अमरावती एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा धावते. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये कायमच गर्दी राहते. यामुळे प्रवाशांना दोन-तीन महिने आधीच तिकीट बुकिंग करून घ्यावे लागते.असे करूनही अनेकदा प्रवाशांना या ट्रेनचे तिकीट मिळत नाही. परिणामी पुणे-लातूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. .
सकाळी ६:१० वाजता – पुण्याकडून लातूरला रवाना होईल आणि दुपारी १२:१० मी. लातूरला पोहोचेल तसेच दुपारी ३:०० वाजता लातूरहून पुण्याला रवाना होईल आणि रात्री ९:०० वाजता पुण्यात पोहोचेल.