मुंबई – आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या विचारसरणीवर भाष्य करणारी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ठाकरे यांनी सध्याच्या काळातील विचारवंत व वाचाळवीरांवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ घेत म्हटले आहे की, “गांधीजी म्हणायचे, बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला.” मात्र, त्यांनी यावर पुढे जोडले की, आजच्या काळात “मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार” या विचाराचा खोल अर्थ हरवला आहे. सध्या कोणताही विचार न पूर्ण झाल्याशिवाय, प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची घाई दिसून येते.
महाराष्ट्रातील वर्तमान परिस्थितीबद्दल बोलताना ठाकरे यांनी वाचाळवीरांची वाढती संख्या अधोरेखित केली. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात वाचाळवीरांना फारच चांगले दिवस आले आहेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते.” माध्यमे आणि सोशल मीडियाचा या वागणुकीत महत्त्वाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. माध्यमांनी या क्षणिक प्रसिद्धीपेक्षा दीर्घकालीन परिणामांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गांधीजींच्या विचारांची कायमस्वरूपी महत्ता स्पष्ट करताना ठाकरे म्हणाले की, गांधीजींच्या विचारांची रुजवण ही मंथनातून झाली होती, आणि त्यांची शिकवण आजही कायम आहे. “गांधीजींना खरी श्रद्धांजली म्हणजे सतत व्यक्त होण्याची उर्मी कमी करून त्यांच्या विचारांची खोली समजणे,” असे ते म्हणाले.
महात्मा गांधींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन करत, राज ठाकरे यांनी विचारशीलतेचे महत्व अधोरेखित केले आहे.