ढोकी: एका महाराजांवरील भक्तीला वडिलांनी केलेला विरोध मुलाच्या इतका जिव्हारी लागला की, त्याने जन्मदात्या पित्याचीच निर्घृण हत्या केली. ‘रामपाल महाराजांची भक्ती करू नको,’ असे वडील रागात म्हणाल्याच्या कारणावरून मुलाने त्यांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्यांना जागीच ठार केले. ही मन सुन्न करणारी घटना धाराशिव तालुक्यातील पळसप येथे घडली आहे.
काय आहे नेमके कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव चंद्रकांत लाकाळ हा रामपाल महाराज यांचा भक्त होता. त्याचे वडील, चंद्रकांत मदन लाकाळ (वय ६५), यांना मुलाचे हे वागणे पसंत नव्हते. याच कारणावरून बाप-लेकामध्ये अनेकदा वाद होत असत. घटनेच्या दिवशी, म्हणजेच ३१ जुलै रोजी रात्री, पुन्हा एकदा याच विषयावरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. ‘त्या महाराजांची भक्ती करायची नाही,’ असे वडिलांनी ठणकावून सांगितल्याने वैभवचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने घरातील खोऱ्याचा दांडा उचलला आणि वडील चंद्रकांत यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचा दुसरा मुलगा प्रमोद लाकाळ (वय २९) यांनी ९ ऑगस्ट रोजी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वैभव लाकाळ विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(३) नुसार खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. केवळ भक्तीच्या वादातून मुलानेच बापाचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.