धाराशिव: मंडळी, १ मे रोजीच्या त्या ‘वादळी’ DPC बैठकीत नेमकं काय शिजलं, याचे तपशील आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत! आधीच २६८ कोटींच्या स्थगितीमुळे वातावरण तापलेलं, त्यात बैठकीत झाला थेट ‘सामना’!
आतमध्ये शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या खास ‘दबंग’ स्टाईलमध्ये थेट पालकमंत्री प्रताप सरनाईक (शिंदे गट) यांनाच जाब विचारला, “साहेब, कुणाच्या सांगण्यावरून स्थगिती दिली? तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात की नाही?” एकदम आर या पारची भाषा! त्यावर पालकमंत्री सरनाईकही कुठे मागे हटणार, त्यांनीही सणसणीत उत्तर दिलं, “पालकमंत्री आहे म्हणूनच तर मुंबईतून इथवर आलोय!” बैठकीत शब्दांचे बाण चांगलेच तळपले म्हणे!
पण खरी पिक्चर तर बैठकीनंतर सुरू झाली!
बैठकीतून बाहेर आल्यावर पालकमंत्री सरनाईक यांनी पत्रकारांसमोर सगळं गुपित उघड केलं. बॉम्ब टाकला की, “भाजप आमदार राणा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोंडी तक्रार केली, त्यामुळेच २६८ कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली आहे!” झालं! एका वाक्यात पालकमंत्र्यांनी सगळं खापर राणा पाटलांवर फोडलं आणि त्यांना या कथेतील ‘खलनायक’ बनवून टाकलं!
आता ‘खलनायक’ ठरल्यावर राणा पाटलांची उडाली धांदल! त्यांनी लगेच सारवासारव सुरू केली. म्हणाले, “अहो नाही, तसं नाही… काही कामांमध्ये गडबड होती, म्हणून स्थगिती दिली.” पत्रकारांनी विचारलं, “काय गडबड होती दादा?” तर उत्तर आलं, “ते सगळं सविस्तर लिहून लवकरच कलेक्टर साहेबांकडे (कीर्ती कुमार पुजार साहेब) तक्रार देणार आहे!” आता ती ‘गडबड’ काय आणि ती ‘लवकरच’ येणारी लेखी तक्रारीची तारीख कधी येणार, हे फक्त राणा साहेबांनाच ठाऊक!
पण थांबा, यामागे आहे मैत्री-दुश्मनीचा अँगल!
एक गोष्ट खरी आहे की, पालकमंत्री सरनाईक (शिंदे गट) आणि खासदार ओमराजे (ठाकरे गट) यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे सरनाईकांनी ओमराजेंनी सुचवलेल्या काही कामांना मंजुरी दिली होती. ही गोष्ट ओमराजेंचे कट्टर राजकीय विरोधक (आणि चुलत भाऊ!) असलेल्या आमदार राणा पाटलांना चांगलीच खटकली (सल!). मग काय, ओमराजेंना शह देण्याच्या नादात, राणा पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून सरसकट सगळ्याच कामांना स्थगिती मिळवून आणली!
…आणि इथेच डाव फसला!
आकडेवारी बघा! या २६८ कोटींमध्ये ओमराजेंच्या शिफारशीची कामं होती फक्त १० टक्के. इतर विरोधी आमदार (कैलास पाटील, प्रवीण स्वामी) आणि तानाजी सावंत मिळून झाले ४० टक्के. उरलेले ६० टक्के कामं तर स्वतः राणा पाटील आणि पालकमंत्री सरनाईक यांच्याच शिफारशीची होती! म्हणजे, ओमराजेंना शह द्यायला गेले आणि स्वतःच्याच ६० टक्के कामांवर पाणी ओतलं! हा शह ओमराजेंपेक्षा जास्त थेट पालकमंत्री सरनाईकांनाच बसला आहे.
निष्कर्ष: या शह-काटशहाच्या खेळात, महायुतीमध्ये मात्र नक्कीच मिठाचा खडा पडला आहे. एका तोंडी तक्रारीने आणि जुन्या मैत्री-दुश्मनीने २६८ कोटींच्या विकासाला ब्रेक लावलाय. आता राणा पाटलांची लेखी तक्रार कधी येतेय, त्यात काय ‘गडबड’ निघतेय, आणि महायुतीतला हा तणाव कसा निवळतोय, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल! पिक्चर अभी बाकी है!