स्थळ: धाराशिव जिल्हा. प्रसंग: भाजप मंत्र्यांचा दौरा. वेध: जिल्ह्याचे एकमेव भाजप आमदार, राणा जगजितसिंह पाटील.
काय योगायोग असतो बघा! राज्याचे दोन-दोन मंत्री, नितेश राणे आणि पंकजा मुंडे, भाजपचा झेंडा घेऊन धाराशिवच्या भूमीत दाखल झाले. देवीचं दर्शन झालं, बैठका झाल्या, पत्रकार परिषदा झाल्या… पण या सगळ्यात जिल्ह्याचे भाजपचे ‘एकमेव’ शिलेदार, आमदार राणा पाटील कुठे होते? अहो, ते ‘अदृश्य’ होते!
ही काही पहिलीच वेळ नाही. राणा पाटलांची ही ‘खास’ सवय जिल्हावासीयांना आता नवीन राहिलेली नाही. पक्षातर्फे जिल्ह्यात कोणीही येवो, कितीही मोठा कार्यक्रम असो, राणा दादांची हजेरी लागायची असेल तर एकच अट – ‘साहेब’ म्हणजे देवेंद्र फडणवीस स्वतः हजर पाहिजेत! बाकीच्या मंत्र्यांच्या दौऱ्यात ते स्वतःला ‘कार्यकर्त्यांवर सोडून’ आरामात असतात. जणू काही त्यांनी फक्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच हजेरी लावण्याचा ‘प्रोटोकॉल’ स्वतःसाठी तयार केला आहे.
आजही तेच घडलं. राणे साहेबांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, पण जिल्ह्याचा सेनापतीच गैरहजर! तिकडे पंकजा ताईंनी तर पत्रकारांशी बोलून थेट परतीचा मार्ग धरला, मेळाव्याकडे त्यांनीही पाठ फिरवली. म्हणजे एकंदरीत, ‘आल मनास, तर कार्यक्रमास’ असाच काहीसा प्रकार दिसला.
पण राणा दादांचा रुसवा जरा ‘स्पेशल’ आहे!
कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज आहे की, हा सगळा मंत्रिपदाचा खेळ आहे. दुसऱ्यांदा आमदार होऊनही मंत्रिपदाने हुलकावणी दिली. मित्रा संस्थेचं उपाध्यक्षपद मिळालं खरं, पण त्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा नाही. कार्यकर्ते बिच्चारे ‘दादा पालकमंत्री होणार’ म्हणून डोळे लावून बसले होते, पण नशिबाने साथ दिली नाही. त्यामुळेच कदाचित, फडणवीसांव्यतिरिक्त इतर मंत्र्यांच्या दौऱ्यात आपली गैरहजेरी दाखवून राणा दादा आपला ‘सायलेंट’ विरोध किंवा नाराजी दिल्लीश्वरांपर्यंत पोहोचवत असावेत.
एकंदरीत काय, तर धाराशिवमध्ये भाजपचा कार्यक्रम करायचा असेल, तर आता निमंत्रण पत्रिकेसोबत राणा पाटलांना ‘उपस्थित राहण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचे शिफारस पत्र’ जोडावे लागेल की काय, असा गंमतीशीर प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे!