धाराशिव: वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्याजवळ असलेल्या तुळजाई कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडीने केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, हे कला केंद्र तात्काळ बंद करून मुलींची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
रिपाइंने जिल्हाधिकाऱ्यांना २० ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या कला केंद्रामध्ये १४ ते १६ वयोगटातील अल्पवयीन मुलींना डांबून त्यांच्यावर रात्रंदिवस अमानुष अत्याचार केले जात आहेत. या केंद्रात बेकायदेशीरपणे मद्य विक्री आणि डान्स पार्ट्या चालत असून, वर्चस्वाच्या वादातून येथे वारंवार गंभीर भांडणे होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या भांडणांमध्ये बंदूक आणि धारदार शस्त्रांचा सर्रास वापर होत असूनही स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या कला केंद्रामुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, स्थानिक महिला आणि शालेय विद्यार्थ्यांवर याचा वाईट परिणाम होत आहे. येथे होणाऱ्या भांडणांमुळे आणि गोळीबाराच्या घटनांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यातील काही तरुणांना येथे बेदम मारहाण करण्यात आली होती, तसेच अनेकांचा अपघाती मृत्यूही या केंद्राशी संबंधित घटनांमुळे झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
हे कला केंद्र मालक आणि स्थानिक पोलिसांच्या संगनमताने चालत असल्याचा गंभीर आरोप करत, रिपाइंने या मुलींची तात्काळ सुटका करून केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष महेश आठवले, ॲड. धम्मानंद वाघमारे, भूषण कांडेकर, राहुल कोकाटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.