कधीकाळी ग्रामीण भागातल्या सामान्य माणसासाठी जीवनवाहिनी ठरलेली लालपरी आज बेवारस अवस्थेत रस्त्यांवर घसरत आहे. “गाव तेथे एसटी” हे केवळ घोषवाक्य उरले आहे, पण “गाव तेथे वेळेवर आणि सुरक्षित एसटी” याची हमी नाही. कधी मध्येच बंद पडणारी बस, कधी सीटवरून बाहेर डोकावणारी स्प्रिंग्स, कधी गळक्या खिडक्यांमधून येणारा पाऊस, तर कधी इंजिनमध्येच पेटणारी आग—या सगळ्या घटनांमधून प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
धाराशिवच्या रस्त्यांवर फिरणारा मृत्यूचा सापळा
धाराशिव जिल्ह्यात अलीकडेच दोन गंभीर घटना घडल्या. लोहारा तालुक्यात बसमध्ये आग लागण्याची घटना तर अत्यंत भीषण होती. बसमध्ये तब्बल ६५ प्रवासी होते, पण चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. यात परिवहन प्रशासनाचं कसब नव्हतं, केवळ चालक-वाहकांचं धैर्य होतं! दुसरी घटना तेरणा धरण पुलाजवळ घडली. स्टिअरिंग जाम झाल्यामुळे बस थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. थोडक्यातच २० फुटांवरून बस कोसळण्याचा धोका टळला.
हे दोन अपघात योगायोगाने टळले, पण पुढील वेळेस नशिबाने साथ दिली नाही, तर काय? दरवेळी चालकाने प्रसंगावधान राखावे अशी अपेक्षा करायची का? एसटी महामंडळाच्या अपयशाचे हे जळजळीत उदाहरण नाही का?
रोग उपचाराचा की मलमपट्टीचा?
धाराशिव जिल्ह्यासाठी ५० नव्या बस देण्याची घोषणा झाली. त्यातील २५ बस आल्याच आहेत, पण उर्वरित २५ केव्हा येणार? महामंडळाला जखमी वाहनांवर केवळ मलमपट्टी करण्याची सवय लागली आहे. बसच्या सीट फाटलेल्या, खिडक्या तुटलेल्या, इंजिन गळक्या, आवाज कर्णकर्कश, पण प्रवासी मात्र प्रचंड! कारण महिलांना अर्धे तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि दिव्यांगांना ७५% सवलत असल्यामुळे लोकांची रेलचेल असते. पण हा प्रवास सुखाचा नसून जणू त्रासाचा ठरतोय.
खऱ्या लालपरीला न्याय कधी?
“लालपरी” म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचं प्रतीक. ती प्रवाशांना नुसतेच वाहून नेत नाही, तर शिक्षण, रोजगार, आरोग्य, आणि सामाजिक सुरक्षितता यांचा दुवा साधते. पण आज ही लालपरी थकली आहे, गंजली आहे, तरीही कोणी दखल घेत नाही.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने नव्या बस उपलब्ध करून द्याव्यात. जुन्या बस दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा. चालक आणि वाहक यांच्यासाठी सुरक्षेच्या सोयी-सुविधा वाढवाव्यात. अन्यथा, एसटीचं अस्तित्व संकटात येईल आणि उद्या ग्रामीण महाराष्ट्र रस्त्यावर येईल!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह