धाराशिव – बीड येथील साक्षी संतोष कांबळे या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी, समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ब्लॅकमेलिंग आणि छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून साक्षीने १४ मार्च २०२५ रोजी धाराशिव येथील आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आंदोलकांनी या प्रकरणी पोलीस तपासावर गंभीर आरोप केले असून, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
बीडच्या नागसेन नगर येथे राहणारी साक्षी संतोष कांबळे (वय २०) ही केएसके महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती. हवाई सुंदरी बनण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल केले, अनैतिक कृत्य करून तिचे जबरदस्तीने व्हिडीओ आणि फोटो काढले, असा आरोप साक्षीची आई कोयना विठ्ठल यांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे असह्य होऊन साक्षीने १४ मार्च २०२५ रोजी धाराशिव येथील बौद्ध नगरातील मामाच्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता आणि आरोपी दोन्ही बीडचे रहिवासी आहेत.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह आणि आंदोलकांच्या मागण्या
आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे होता. मात्र, त्यांनी आरोपींशी संगनमत करून सखोल तपास केला नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि आरोपींविरोधात समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलकांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- साक्षीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- मुख्य आरोपी अभिजीत एकनाथ कदम याचा जामीन रद्द करून त्याला तात्काळ अटक करावी व शिक्षा होईपर्यंत तुरुंगात ठेवावे.
- फरार सहआरोपी शितल एकनाथ कदम (आरोपीची बहीण) हिला तात्काळ अटक करून सखोल चौकशी करावी.
- तपास अधिकारी डीवायएसपी स्वप्नील राठोड यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी.
- डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे तपास असलेल्या जिल्ह्यातील इतर अॅट्रॉसिटी प्रकरणांचीही चौकशी करण्यात यावी.
आईचा आक्रोश आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र
साक्षीची आई कोयना यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून न्यायाची याचना केली आहे. “साहेब, मी तुमची लाडकी बहीण आहे… माझ्या मुलीने काही मुलांच्या त्रासामुळे गळफास घेतला… तिला न्याय द्या,” असे त्यांनी म्हटले आहे. याच आरोपींच्या त्रासामुळे केएसके महाविद्यालयातील इतर दोन मुलींनीही आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. आरोपींची दहशत असल्याने कोणी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, धारशिव येथील पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी जबाब व्यवस्थित घेतला नाही आणि आरोपींना अनुकूल वागणूक दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आरोपीची बहीण शीतल कदम पोलीस दलात असल्याने धारशिव पोलीस मदत करत नसल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
लग्नाच्या काही दिवस आधीच संपवले जीवन
साक्षी कांबळे हिचा विवाह २० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील एका मुलासोबत निश्चित झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधीच, १४ मार्च रोजी तिने आपले जीवन संपवले. अभिजीत कदम आणि शीतल कदम यांच्या धमक्यांमुळेच साक्षीने आत्महत्या केली, असे कोयना यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाचे निवेदन माजी नगरसेवक राणा कमलाकर बनसोडे, युवा भीम सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव भारत भोसले आणि भीमशक्ती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेसा जयकुमार जानराव यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. साक्षी कांबळे आणि तिच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.