तुळजापूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष (आण्णा) देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यात एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये तुळजापूर शहरासह तालुक्यातील व्यापारी, दुकानदार आणि विविध संघटनांनी सहभाग घेतला. सर्व आस्थापने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो वृत्तवाहिन्या, न्यूज वेबसाइट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. फोटो पाहून अनेक लोक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत आणि या राक्षसी कृत्याचा निषेध करीत आहेत.
तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र आहे. येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. आजच्या बंदमुळे भाविकांचे हाल झाले. तसेच शहरात शुकशुकाट दिसत होता.
जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी व जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. तसेच, राज्यातील गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून सांगण्यात आले.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना याप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणीही यावेळी कऱण्यात आली आहे.