धाराशिव: तालुक्यातील सारोळा (बु.) शिवारात सेरेंटिका रिन्युएबल एनर्जी इंडिया ५ प्रा. लि. या पवनचक्की कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला गंडा घालण्यात येत आहे. महसूल प्रशासनाला कोण वाकडे करणार, या अविर्भावात कंपनीकडून थेट मध्यरात्री टिप्परच्या साह्याने मुरूम उपसा केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
पवनचक्की कंपनीचा महसूल प्रशासनाला ‘ओपन चॅलेंज’
सारोळा शिवारात जवळपास १० पवनचक्क्यांचे मनोरे उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी हजारो ब्रास मुरूम बेकायदेशीररीत्या उपसा करून भरला जात आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टी जमा करण्यात आलेली नाही. गायरान व खाजगी जमिनीतून नियम धाब्यावर बसवून उत्खनन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल लाटणाऱ्या पवनचक्की माफियांनी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देत लूट केली, आता त्यांनी महसूल प्रशासनालाही खुले आव्हान दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; पंचनामा सुरू
रविवारी (दि. २) रात्री जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने महसूल अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले. सोमवारी सकाळीच मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनाम्यात दोन पवनचक्कींसाठीच सुमारे ६०० ब्रास मुरूम विनापरवाना उपसा करण्यात आल्याचे आढळले आहे. या अहवालाची प्रत महसूल प्रशासनाला सादर करण्यात आली असून दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र, केवळ पंचनाम्यापुरतेच प्रशासन थांबणार का, की दोषी कंपनीवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल केला जाणार, याबाबत संभ्रम आहे. महसूल विभागाने तत्काळ दंड वसूल करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शासनाने त्वरीत कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला, शासनाचा महसूल लुटणे आणि नियमांना हरताळ फासणे हे प्रकार थांबवण्यासाठी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
➡ जिल्हा प्रशासन आता या प्रकरणी काय भूमिका घेतं आणि दोषींवर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.