धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मदत करण्यासाठी आणि बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरणाकडे डोळेझाक केल्याचा ठपका ठेवत, निवडणूक निर्णय अधिकारी (RO) ओंकार देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. युवासेना (उबाठा) तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने (SEC) गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना या प्रकरणी तातडीने चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
धाराशिव नगर परिषदेसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर (Dharashiv 2.0 या पेजवरून) एका बोगस टीव्ही चॅनेलचा वापर करून एक ‘एक्झिट पोल’ व्हायरल करण्यात आला. यामध्ये भाजपच्या उमेदवार नेहा काकडे या विजयी होत असल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या परवीन खलिफा कुरेशी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे भासवण्यात आले. आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा हा प्रकार मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच केला गेल्याचे उघड होते.
अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांशी ‘साटेलोटे’?
या गंभीर प्रकाराबाबत युवासेनेचे राकेश सूर्यवंशी यांनी १ डिसेंबर रोजीच जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा यासाठी देशमुख यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केली आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम केले, असा खळबळजनक आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. चार-पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने, अधिकारी आणि सत्ताधारी यांचे ‘साटेलोटे’ असल्याची चर्चा शहरात सुरू झाली होती.
आयोगाचा ‘अॅक्शन मोड’
स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचे पाहून सूर्यवंशी यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आयोगाच्या आचारसंहिता कक्षाने या तक्रारीची तात्काळ दखल घेतली आहे. आयोगाने ५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना पाठवलेल्या ई-मेलद्वारे स्पष्ट निर्देश दिले आहेत की, राकेश सूर्यवंशी यांच्या तक्रार अर्जातील मुद्द्यांच्या अनुषंगाने ‘वस्तुस्थितीची चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट सविस्तर अहवाल आयोगास तात्काळ सादर करावा.’
निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पार पाडण्याची जबाबदारी असताना, खुद्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरच पक्षपाताचा आरोप झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता जिल्हाधिकारी आपल्या अहवालात ओंकार देशमुख यांना पाठीशी घालतात की दोषी ठरवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






