धाराशिव – येथील स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत १४ घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. धर्मेंद्र उर्फ काळया विलास भोसले (वय २३, रा. शिंदगाव, ता. तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ७० ग्रॅम सोन्याची लगड, ज्याची किंमत ६ लाख ३० हजार रुपये आहे, जप्त करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक शुक्रवारी, दिनांक १८ जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोहारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित आरोपी धर्मेंद्र भोसले हा धाराशिव शहरात आला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान धर्मेंद्र भोसले याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याने मुरूम, लोहारा, नळदुर्ग आणि तुळजापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हे अभिलेख तपासले असता, त्याच्याकडून एकूण १४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरीच्या मालाबाबत विचारपूस केली असता, त्याने आपल्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने हे पत्नीचे असल्याचे सांगून एका सोनाराला विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी तात्काळ त्या सोनाराकडून ७० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (किंमत ६,३०,००० रुपये) पंचनामा करून जप्त केली आहे. सदरचे गुन्हे त्याने इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुलीही दिली आहे.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी लोहारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, महिला पोलीस हवालदार शैला टेळे, पोलीस नाईक अशोक ढगारे आणि चालक पोलीस अंमलदार नितीन भोसले व रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.