कोल्हापूर – मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सध्या कोणताही विचार करण्याचे कारण नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, यापूर्वीही असे अनेकदा घडले आहे की, नेतृत्व कोण करणार याचा निर्णय निवडणुकीनंतरच घेतला जातो, जो संख्या बलावर आधारित असतो. “आज कोणताही ठोस निर्णय घेण्याची गरज नाही, मात्र बहुमत मिळण्याची शक्यता नक्कीच आहे,” असेही पवार यांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्री पदाबाबत काहीही ठरवण्याचे कारण नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत होते.
महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, काँग्रेसप्रमाणेच आता शरद पवार यांनी देखील ही मागणी फेटाळली आहे. त्यांनी 1977 च्या निवडणुकीचे उदाहरण देत सांगितले की, आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत देखील कोणत्याही व्यक्तीला नेतृत्वासाठी पुढे केले गेले नव्हते. जयप्रकाश नारायण यांनी सर्वांना एकत्र येऊन आणीबाणीला विरोध करावा, असे आवाहन केले होते. निवडणुकीनंतर मुरारजी देसाई यांचे नाव पुढे आले, ज्यांची निवडणुकीपूर्वी कोणतीही चर्चा नव्हती. म्हणूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच जाहीर करण्याची आवश्यकता नाही, असे पवार म्हणाले. तीनही पक्ष एकत्र बसून राज्याला स्थिर सरकार देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “ज्यांचे संख्याबळ जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होईल,” असे पवारांनी शेवटी सांगितले.
शरद पवार योग्यच बोलले, आम्ही मविआ म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार – नाना पटोले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीनंतरच ठरवला जाईल, असे स्पष्ट केले. काँग्रेसनेही त्यांच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले असून, उद्धव ठाकरे यांच्या मागणीला फारसे महत्त्व दिलेले नाही. “शरद पवार बोलले ते योग्यच आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.