धाराशिव – पोलीस ठाण्यात अगोदर दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथे घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टसह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुपकुमार सुखदेव कांबळे (रा. देवराज नगर, तुळजापूर, जि. धाराशिव) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपकुमार कांबळे हे दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गडाकडे जात होते. त्यावेळी शिंगोली येथील हिंदू स्मशानभूमीजवळ आरोपी विष्णू गणपत मुळे, कमल भालेकर आणि सौरभ उर्फ बबल्या रणदिवे (सर्व रा. शिंगोली, ता. जि. धाराशिव) यांनी त्यांना अडवले.
आरोपींनी कांबळे यांना ‘तू आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली?’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. तसेच तिघांनी संगनमत करून कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर अनुपकुमार कांबळे यांनी मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विष्णू मुळे, कमल भालेकर आणि सौरभ रणदिवे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






