तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील शिराढोण गावात एका अत्यंत क्षुल्लक कारणावरून एकाच कुटुंबातील सदस्यांना गंभीर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात खेळणाऱ्या मुलीकडून शेजाऱ्यांच्या अंगणात खडा गेल्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेला आणि त्यातून ही मारहाण झाली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर जवळपास १४ दिवसांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शिराढोण येथे घडली. फिर्यादी दैवशाला चत्रभुज भिसे (वय ४५, रा. शिराढोण) यांची नात अंगणात खेळत होती. खेळताना तिच्याकडून एक खडा शेजारी राहणाऱ्या अशोक ज्ञानदेव भिसे यांच्या अंगणात गेला. याच किरकोळ कारणावरून आरोपी अशोक ज्ञानदेव भिसे, त्याचा मुलगा सागर अशोक भिसे, सचिन अशोक भिसे आणि पत्नी सिंदुबाई भिसे (सर्व रा. शिराढोण) यांनी फिर्यादी दैवशाला भिसे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी दैवशाला भिसे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने (तुंब्यांनी) आणि इतर दांड्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दैवशाला भिसे गंभीर जखमी झाल्या.
या भांडणात दैवशाला भिसे यांचे पती चत्रभुज भिसे हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर जखमी दैवशाला भिसे यांनी दि. १८ एप्रिल २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात उपस्थित होऊन घडलेल्या प्रकाराची फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून आरोपी अशोक ज्ञानदेव भिसे, सागर अशोक भिसे, सचिन अशोक भिसे आणि सिंदुबाई भिसे या चौघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे परिसरात चर्चा सुरू आहे.