धाराशिव – मालवण येथे घडलेल्या घटनेतील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी आज धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयात जोरदार निदर्शने केली. आंदोलन इतके तीव्र झाले की कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षक मुख्यालयात घुसून एकच गोंधळ घातला.
आंदोलकांनी कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले आणि घोषणाबाजी थांबवण्यास सांगितले. मात्र, आंदोलक आणखीच आक्रमक झाले आणि पोलिसांशी बाचाबाची करू लागले.
आंदोलन नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांनी दगड उचलून पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर फेकण्यास सुरुवात केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
पोलीस अधीक्षक यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आंदोलकांशी संवाद साधला आणि लवकरच गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन आनंदनगर पोलीस स्टेशनसमोर स्थलांतरित करण्यात आले.
शिवप्रेमींची भूमिका ठाम
आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की जोपर्यंत मालवण घटनेतील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ते आपले आंदोलन मागे घेणार नाहीत. सध्या आनंदनगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरू असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. आंदोलकांच्या मागणीवर पोलीस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.