धाराशिव | रेशीम उद्योग सहाय्यक अधिकारी रत्नदीप भुजंग गंगावणे यांची विशेष सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१९ मध्ये त्यांच्यावर साडेसात हजार रुपयांच्या लाचप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची सुटका केली.
प्रकरणाचा तपशील
तक्रारदार युवराज जाधव यांनी ८ जानेवारी २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे तक्रार दिली होती की, रेशीम कीटक संगोपन गृह, तुती लागवड यासंबंधी मंजूर मनरेगा अंतर्गत बिल काढण्यासाठी गंगावणे यांनी लाचेची मागणी केली होती. त्यांनी ७ ते ८ हजार रुपये मागितले होते आणि ८ ते १० दिवसांत कार्यालयात येण्यास सांगितले होते.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि ४,५०० रुपये स्वीकारताना गंगावणे यांना अटक करण्यात आली. आरोपीच्या हातावर लाचखोऱ्याच्या नोटांवरील ॲन्थ्रासिन पावडरचा रंग आढळून आला. त्यानंतर आनंद नगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
न्यायालयीन सुनावणी आणि निर्दोष मुक्तता
विशेष केस क्र. ५९/२०१९ अंतर्गत अँटी करप्शनचे विशेष सत्र न्यायालयात खटला चालला. सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले, मात्र बचाव पक्षाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विजयकुमार शिंदे यांनी प्रभावी युक्तिवाद करत साक्षीदारांची उलटतपासणी घेतली.
विशेषतः तत्कालीन जिल्हाधिकारी दिपाली मुधोळ – मुंढे यांच्या साक्षीवर बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. परिणामी, पुराव्याअभावी न्यायालयाने रत्नदीप गंगावणे यांची निर्दोष मुक्तता केली.
बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
या खटल्यात ॲड. विजयकुमार शिंदे यांना ॲड. विश्वजीत शिंदे, ॲड. अजित राठोड, ॲड. भाग्यश्री रणखांब, ॲड. ज्योती जगताप आणि पवनराजे पांचाळ यांनी सहकार्य केले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. न्यायालयाच्या निकालानंतर गंगावणे यांनी दिलासा व्यक्त केला.