परंडा – चुलत भावाचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाला सहा जणांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, स्टीलच्या कड्याने आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील घारगाव तांडा येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी नंदु बबन काळे (वय ३२, रा. घारगाव तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश गवळी, कुणाल संजय लटके, प्रेम कांतीलाल लटके, भगवान रामा शिंदे, ओंकार नारायण गवळी आणि सौरभ धनाजी उमाप (सर्व रा. घारगाव तांडा) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार, दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घारगाव तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ घडली. फिर्यादी नंदु काळे यांचे चुलत भाऊ आणि आरोपी यांच्यात वाद सुरू होता. हे भांडण सोडवण्यासाठी नंदु काळे पुढे गेले असता, याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्या, स्टीलचा कडा व बेल्टने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर नंदु काळे यांनी शनिवारी, दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १८९(२), १९१(२)(३), १९०, ११५(२), २९६, १२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.