धाराशिव- जिल्ह्यातील जलसंधारणाच्या (PMKSY) २.० योजनेअंतर्गत (PIA) निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जयभवानी कृषी विज्ञान मंडळ ईटकुर (ता. कळंब) यांनी केला आहे. यासंदर्भात मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
जयभवानी कृषी विज्ञान मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्याचे मृद व जलसंधारण अधिकारी यांनी लोकमान्य शिक्षण संस्था लातूर या संस्थेसोबत संगनमत करून कार्यालयीन गोपनीयतेचा भंग केला आहे. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या दि. २४ डिसेंबर २०२४ च्या गुणांकन यादीची माहिती २० दिवस अगोदरच संस्थेला देण्यात आली. त्यानंतर दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी लोकमान्य शिक्षण संस्था लातूर यांचा प्रस्ताव स्वीकारून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यालयीन टिप्पणी मंजूर करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, जलसंधारण अधिकारी यांनी कार्यालयीन गोपनीयतेचा भंग केला असून, मर्जीतील संस्थेला भ्रष्टाचाराच्या उद्देशाने निवडून दिले आहे. तसेच प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग करून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या दि. ११ ऑक्टोबर २०२४ च्या (PTO) निवड यादीप्रमाणे जिल्ह्यातील संस्थांना योग्य न्याय देण्यात यावा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयभवानी कृषी विज्ञान मंडळ ईटकुरचे अध्यक्ष विकास ज्ञानदेव गंभिरे व सचिव रविकांत प्रकाश चव्हाण यांनी केली आहे.
सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आली असून, या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.