धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, नागरिक भयभीत झाले आहेत. कळंब, उमरगा, तुळजापूर आणि ढोकी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी अनेक गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंद घरांपासून ते शासकीय कार्यालयांच्या पार्किंगमधील वाहने आणि विजेच्या तारांपर्यंत कशावरही डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. या घटनांमध्ये नागरिकांचे आणि कंपन्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
कळंबमध्ये दोन मोठ्या चोऱ्या:
कळंब शहरातील पापडे गल्ली येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय संजविनी शिवराम बिडवे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी गॅस टाकी आणि १०,००० रुपयांची रोकड असा एकूण १३,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. ०८.०९.२०२५ रोजी दुपारच्या वेळी घडली.
याशिवाय, कळंब तालुक्यातील मोहा शिवारात आनंदवाडी इंप्रा प्रा. लि. कंपनीने बसवलेल्या विजेच्या खांबांवरील तब्बल ८,३९,१६८ रुपये किमतीची २,३३७ किलो वजनाची ॲल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी औदुंबर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
उमरग्यात बंद घर फोडले:
उमरगा येथील धनलक्ष्मी कॉलनीत राहणाऱ्या रागिनी खंडू जाधव या काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ५,००० रुपयांची रोकड असा एकूण ३१,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
तुळजापुरात तहसील कार्यालयातून दुचाकी लंपास:
तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील महेश गोरोबा घेघुले हे आपल्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलने (क्र. एमएच १३ डीव्ही ६८०२) तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी आपली ४०,००० रुपये किमतीची मोटरसायकल पार्किंगमध्ये उभी केली असता, अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. दिवसाढवळ्या शासकीय कार्यालयाच्या आवारातून वाहन चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ढोकीत सौर ऊर्जा प्रकल्पातून केबल वायरची चोरी:
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तावरजखेडा शिवारात सनसुअर एनर्जी प्रा. लि. या सौर ऊर्जा कंपनीच्या साईटवरून चोरट्यांनी तब्बल १,३४८ मीटर लांबीची केबल वायर चोरली. या चोरी झालेल्या वायरची किंमत अंदाजे ७०,०२८ रुपये आहे. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर पोल्टु गोविंद विश्वास यांनी तक्रार दाखल केली आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.