धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, ढोकी आणि कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी साडेपाच लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये शेतातील गोदामातून हरभऱ्याची पोती, घरातून सोन्याचे दागिने आणि शेतातून केबल वायर व मोटारींचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस तपास करत आहेत.
गोदामातून दोन लाखांचा हरभरा चोरीला
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किणी येथे एका कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी तब्बल ७० हरभऱ्याची पोती चोरून नेली. मंगेश भारत मुळे (वय ३२, रा. धाराशिव) यांच्या मालकीच्या ‘वरद विनायक ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी’चे हे गोदाम आहे. १६ ते १७ ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि अंदाजे २,१०,००० रुपये किमतीचा हरभरा चोरून नेला. याप्रकरणी मंगेश मुळे यांनी १९ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए) आणि ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरवाजा उघडून पावणे तीन लाखांचे दागिने पळवले
दुसरी घटना ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळेकरवाडी येथे घडली. प्रियंका दत्तात्रय ढवरे (वय ३०, रा. धाराशिव) या माहेरी आल्या होत्या. १३ ते १४ ऑगस्टच्या रात्री घरातील सर्वजण बाहेर दरवाजा लावून झोपले असताना, अज्ञात चोराने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. चोराने प्रियंका यांच्या बॅगेतील ९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३,००० रुपयांची रोकड असा एकूण २,८१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी १९ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून ढोकी पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ शेतकऱ्यांच्या केबल वायर आणि मोटारी चोरीला
कळंब तालुक्यातील हावरगाव शिवारात शेतातील केबल वायर आणि पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बिभीषण पांडुरंग कोल्हे (वय ३८) आणि इतर ११ शेतकऱ्यांच्या शेत गट क्रमांक १३९ व १४५ मधून चोरट्यांनी केबल वायर आणि मोटारी चोरल्या. ११ ते १२ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या या घटनेत शेतकऱ्यांचे एकूण ५३,०८० रुपयांचे नुकसान झाले आहे. बिभीषण कोल्हे यांनी १९ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.