धाराशिव –समाजात भाव खाण्यासाठी एक नवा जॉब लवकरच उपलब्ध होणार आहे—विशेष कार्यकारी अधिकारी! राज्य सरकारच्या ताज्या निर्णयानुसार धाराशिव (किंवा अजूनही सरकारी बाबूंच्या मनात असलेला ‘उस्मानाबाद’) जिल्ह्यात तब्बल २८०८ विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जाणार आहेत.
या पदासाठी एका गोष्टीची मात्र खात्री आहे—शैक्षणिक पात्रतेपेक्षा राजकीय वजन महत्त्वाचं! अर्जासोबत स्थानिक नेत्याची शिफारस जोडली, की आपला शिक्का-पेपरांचा व्यवसाय सुरू!
झेरॉक्सवाल्यांचा सुवर्णकाळ परत येतोय!
मागच्या काळात प्रत्येक झेरॉक्स दुकानात ‘विशेष कार्यकारी अधिकारी’चा शिक्का हमखास सापडायचा. सही झेरॉक्सवाला स्वतःच मारायचा, आणि शिक्क्याच्या साक्षीने विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे अधिकृत ठरायची! अर्थात, झेरॉक्स १ रुपयाला असेल, तर शिक्क्यासोबत २ रुपये घेतले जायचे.
आता सरकारच्या या निर्णयामुळे सर्टिफाइड झेरॉक्सवाल्यांचे अच्छे दिन पुन्हा आलेत! कोणतीही खास जबाबदारी नसलेलं, पण नाव मोठं असलेलं हे पद घेण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडणार, हे नक्की!
तर मंडळी, लवकरच आपल्या ओळखीतला कोणी तरी “विशेष कार्यकारी अधिकारी” होणार आहे. त्याच्याकडून किमान एक तरी सही करून घ्या—उगाच पद वाया जाऊ देऊ नका!
पद कशासाठी?
कुणी म्हणेल, हे पद नक्की कशासाठी? उत्तर अगदी सोपं आहे—
✅ झेरॉक्स केलेल्या कागदांना शिक्का मारायचा
✅ सत्यप्रत म्हणून सही द्यायची
✅ आणि हो… चिरीमिरीही घ्यायची!
पण खरी मजा दुसरीकडे आहे. या पदाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे… घराच्या दरवाज्यावर आणि ऑफिसमध्ये लावण्यासाठी जबरदस्त पाटी मिळणार!
“विशेष कार्यकारी अधिकारी – अमुकतमुक” अशी पाटी लागली, की लोक तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तीसमजून नमस्कार ठोकणार. कोणत्याही फाइलवर तुम्ही सही केली की समोरचा तुम्हाला अधिकारी समजणार. आणि हो, स्वतःच्या नावासमोर “विशेष” हा शब्द दिसला की आत्मसंतोष मिळणार, तो वेगळाच!
‘बिनपगारी अधिकारी’ होण्याची संधी गमावू नका!
या पदाला शासन कोणतंही मानधन देणार नाही – म्हणजेच बिनपगारी, पण फुल्ल अधिकारी! तर, घराच्या दरवाज्यावर किंवा ऑफिसमध्ये वजनदार पाटी लावायची असेल, आणि काम कमी, पण अधिकार जास्त हवे असतील, तर ही सुवर्णसंधी लवकर पकडा! नाहीतर संधी हुकली म्हणायची!