उमरगा: प्रवाशांसाठी ठरवून दिलेल्या थांब्यावर बस न थांबवता एका प्रवाशाला मध्येच का सोडले, या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने एसटी बस वाहकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना तालुक्यातील डिग्गी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली असून, याप्रकरणी सागर गुरुनाथ कवठे याच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दयानंद गोविंदराव संगमे (वय ५७, रा. एसटी कॉलनी, उमरगा) हे राज्य परिवहन महामंडळाच्या उमरगा आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ८:०० वाजेच्या सुमारास ते आपले कर्तव्य बजावत असताना डिग्गी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा प्रकार घडला.
आरोपी सागर गुरुनाथ कवठे (रा. डिग्गी) याने, बस थांबत नसताना एका प्रवाशाला का उतरवले, या कारणावरून वाहक संगमे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने संगमे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संगमे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर वाहक दयानंद संगमे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी सागर कवठे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.