कळंब – वडिलांचे हाफ तिकीट काढण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड मागितल्याचा राग मनात धरून एसटी चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळंब येथे घडली आहे. याप्रकरणी चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निखिल शरद आडसुळ (वय ४५, व्यवसाय- चालक, रा. ईटकर, ता. कळंब) हे कळंब आगाराचे चालक आहेत. दि. २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते आपली ड्युटी बजावत पुणे एसटी बस घेऊन जात होते. यावेळी आरोपी अभिजीत बाळासाहेब मडके, ज्ञानेश्वर उर्फ माउली मडके, सचिन देडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने आडसुळ यांच्याशी वाद घातला.
आरोपींनी त्यांच्या वडिलांचे हाफ तिकीट काढण्यासाठी सवलत मिळावी म्हणून आग्रह धरला असता, चालकाने नियमानुसार ओरिजनल आधार कार्ड दाखवण्याची मागणी केली. याचा राग आल्याने आरोपींनी आडसुळ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर, “तुम्ही जर या रोडवर ड्युटीला आला तर बघून घेऊ,” अशी धमकीही आरोपींनी चालकाला दिली.
या घटनेनंतर चालक निखिल आडसुळ यांनी दि. २३ जानेवारी २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिजीत मडके, ज्ञानेश्वर मडके, सचिन देडे व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(२), १२६(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.






