मुंबई – महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीच्या स्टिअरिंगवर बसून किंवा डेपोत काम करताना ‘घोटभर’ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आता काही खरे नाही. लाखो प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या अशा ‘मद्यपी’ कर्मचाऱ्यांविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट ‘अॅक्शन मोड’ सुरू केला आहे. राज्यभरात राबवलेल्या एका धडक आणि गुप्त मोहिमेत, कर्तव्यावर असताना मद्यपान केलेले तब्बल ७ कर्मचारी सापडले असून, त्यांच्यावर थेट निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे.
अचानक ‘धाड’ अन् उडाली खळबळ!
प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला ‘ऑपरेशन क्लीन’चे आदेश दिले होते. त्यानुसार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी, कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यभरातील सर्व विभागांमध्ये एकाच वेळी ही मद्यपान तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या अचानक तपासणीमुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईत संशयास्पद वाटणाऱ्या ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी अशा एकूण १७०१ कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली.
सात जण ‘रंगेहाथ’ सापडले!
या धडक कारवाईत एकूण ७ कर्मचारी मद्याच्या नशेत कर्तव्य बजावत असल्याचे उघड झाले. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.
- धुळे विभाग: १ चालक, १ यांत्रिक कर्मचारी, १ स्वच्छक
- नाशिक विभाग: १ चालक
- परभणी विभाग: १ यांत्रिक कर्मचारी
- भंडारा विभाग: १ यांत्रिक कर्मचारी
- नांदेड विभाग: १ वाहक
“दयामाया दाखवणार नाही” – मंत्री सरनाईक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कारवाईवर कठोर भूमिका घेतली आहे. “एसटी ही सर्वसामान्यांची वाहिनी आहे. कर्तव्यावर मद्यपान करणे हा गंभीर गुन्हा असून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्याच्या अमलाखाली आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येईल,” असा सज्जड दमच सरनाईक यांनी दिला आहे. भविष्यातही अशा अचानक तपासणी मोहिमा सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आता बसमध्येच ‘ब्रेथ ॲनलायझर’
केवळ कारवाईवर न थांबता, मद्यपी चालकांना कायमचा आळा घालण्यासाठी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार, “भविष्यात येणाऱ्या सर्व नवीन एसटी बसेसमध्ये चालकाच्या समोरच ‘ब्रेथ ॲनलायझर’ (मद्य तपासणी यंत्र) बसवण्यात येणार आहे.” यामुळे बस सुरू करण्यापूर्वीच चालकाची तपासणी होईल आणि मद्यपी चालकांना प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यापासून रोखता येईल. महामंडळाच्या या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेचे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापराच्या निर्णयाचे सामान्य प्रवाशांकडून स्वागत होत आहे.






