येरमाळा: “तू छाती बाहेर काढून का चालतो? लय शाईनिंग मारतो,” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी स्टम्प आणि हँगरने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कळंब तालुक्यातील उकडगाव येथील चंद्रभानू सोनवणे कॉलेजच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशिक अमित बनसोडे (वय १७, रा. ताटे प्लॉटजवळ, पंचशील नगर, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा शिक्षणानिमित्त उकडगाव येथील वसतिगृहात राहतो. रविवारी (दि. २१ डिसेंबर) रात्री १ वाजेच्या सुमारास वसतिगृहात ही घटना घडली.
आरोपी अमर अमित कोंढारे, यश मारकड आणि सौरभ समुद्रे (सर्व राहणार चंद्रभानू सोनवणे कॉलेज हॉस्टेल, उकडगाव) यांनी प्रशिकला गाठले. “तू छाती बाहेर काढून का चालतो? लय शाईनिंग मारतो,” असे म्हणत त्यांनी कुरापत काढली. त्यानंतर आरोपींनी प्रशिकला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी लाकडी स्टम्प, हँगर आणि काठीने मारहाण करून त्याला जखमी केले.
जखमी प्रशिक बनसोडे याने मंगळवारी (दि. २३) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






