धाराशिव: शहरातील हातलाई देवी तलाव परिसरातील एका खासगी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर चंद्रकांत कुरुंद (रा. पारा, ता. वाशी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने दोन दिवसांपूर्वीच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, काल सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारा येथील सागर कुरुंद हा तरुण शिक्षणाच्या निमित्ताने धाराशिव शहरात आला होता. तो हातलाई देवी तलाव परिसरातील एका वसतिगृहात वास्तव्यास होता. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळच्या सुमारास सागर याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याने दोन दिवसांपूर्वीच हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


सागरने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरासह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.






