मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) चे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील, दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा खटला तब्बल 19 वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणात आरोपींकडून वारंवार विविध कारणे दाखवून सुनावणी लांबवली जात होती. त्यामुळे त्यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत खटला मे 2025 अखेर निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट इशारा
सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना स्पष्ट केलं आहे की, आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न केल्यास, सुनावणी करणाऱ्या न्यायालयाला आरोपींचा जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल. न्यायालयाने मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयाला खटला निकाली काढण्यासाठी मे 2025 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
खटल्याची पार्श्वभूमी
दि. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची मुंबईतील कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माजी खासदार डॉ. पदमसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना अटक करण्यात आली होती. यातील सात आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत, तर दोन आरोपी अद्याप कारागृहात आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, निंबाळकर कुटुंबीयांनी या तपासावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे 2008 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयच्या तपासात पवनराजे यांचा खून हा सुगंधित तुपाचा कारखाना आणि जमिनीच्या व्यवहारावरून झाल्याचे निष्पन्न झाले.
हत्या कशी घडली?
3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर पुण्याच्या दिशेने जात असताना कळंबोली येथे एका व्यक्तीला भेटण्यासाठी थांबले. तेव्हा पांढऱ्या स्कोडा कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. सुरुवातीला त्यांनी चौकशी करण्याच्या बहाण्याने खिडकी उघडण्यास सांगितले आणि काही क्षणातच पवनराजे यांच्यावर बेधडक गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे चालक समद काझी गंभीर जखमी झाले.नंतर त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तपासाचा सुगावा आणि आरोपपत्र
पवनराजे निंबाळकर हत्येचा तपास सुरूवातीला कळंबोली पोलिसांनी केला. मात्र, त्यात प्रगती न झाल्याने निंबाळकर कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर 2009 मध्ये मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती एक महत्त्वाचा सुगावा लागला. डोंबिवलीतील व्यापारी पारसमल जैन याला अटक केल्यानंतर त्याने महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार, पवनराजे यांची हत्या सुपारी देऊन करवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून 9 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने दिवंगत पवनराजे निंबाळकर
यांचे चुलत बंधू आणि माजी खासदार, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर षडयंत्र (120-B), हत्या (302) आणि आर्म्स कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पवनराजे हत्या प्रकरणातील एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार बनला आहे.
आरोपींच्या युक्त्या आणि न्यायालयाचा निर्णय
गेल्या काही वर्षांपासून आरोपी वेगवेगळ्या कारणांनी खटला पुढे ढकलत होते. त्यामुळे आनंदीदेवी निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत न्याय मागितला. सुप्रीम कोर्टाने यावर तातडीने दखल घेतली आणि मे 2025 पर्यंत खटला निकाली काढण्याचा आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे खटला लांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला तर संबंधित न्यायालय आरोपींचा जामीन रद्द करू शकते.
पुढील कायदेशीर प्रक्रिया
- अतिरिक्त सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला गती दिली जाणार.
- मे 2025 पर्यंत खटला पूर्ण करण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल.
- आरोपींकडून उशीर करण्याचा प्रयत्न झाला, तर त्यांना जामीन नाकारला जाऊ शकतो.
गेल्या 19 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या हत्येच्या खटल्याला आता अंतिम टप्पा गाठण्यास वेळ लागणार नाही, अशी आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबीयांना न्याय मिळण्याची शक्यता बळावली आहे.