धाराशिव तहसील कार्यालयात “वाझे सिस्टर” मॅडमच्या आशीर्वादाने काळे कारनामे करणाऱ्या एका लिपिकाची तुळजापुरात बदली झाली होती. पण हा पठ्ठ्या एवढा गुणी निघाला की प्रतिनियुक्ती मिळवून परत आला आणि चक्क नायब तहसीलदाराच्या खुर्चीवर नजर ठेऊन बसला!
या हुशार लिपिकाने वर्ग दोनच्या जमिनी एक करणे, बागायती जमिनींना अकृषी बनवणे, प्लॉटिंगला एनए लाऊट मंजूर करणे, ओपन स्पेस गायब करणे अशा अनेक “करामती” करून लाखोंच्या लाचांचा डोंगर उभा केला. पैसे एवढे जमले की मॅडमने तर ठिकठिकाणी जमिनी, प्लॉटिंग घेतले, आणि लिपिक साहेबांनीही बारुळला जमीन आणि तुळजापुरात बंगला उभा केला!
हा लिपिक स्वतःला नायब तहसीलदारच समजत होता! आलिशान गाडीतून ये-जा करत, ऑफिसमध्ये बॉसगिरी करत, सरकारी खुर्चीवर पाय टाकून मिरवत होता. पण शेवटी “धाराशिव लाइव्ह” ने या कारनाम्यांचा भांडाफोड केला आणि त्याची प्रतिनियुक्ती रद्द झाली.
पण हा लिपिक एवढा धाडसी की तुळजापुरात गेल्यावरही तहसीलदारांना गोंधळात टाकून तिथेच काळे धंदे सुरू केले. आता साहेब “ऑफिसरचा लाडका” बनले आहेत! त्यामुळे धाराशिव आणि तुळजापुरात झालेल्या या गडबड-गोंधळाची चौकशी वरिष्ठांनी करायला हवी! नाहीतर उद्या हा लिपिक मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची खुर्चीही बुक करून ठेवेल!