तामलवाडी: मंडळी, पिक्चर बघाया थिएटरला जायची गरज नाही! तामलवाडी पोलीस स्टेशनमध्येच असा काही ‘सस्पेन्स थ्रिलर’ कम ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ सुरू आहे की विचारायची सोय नाही. झालंय काय, तर तुळजापूरचं ते गाजतंय ना ड्रग्ज प्रकरण? त्यातला एक मुख्य आरोपी, विनोद गंगणे, अजून पोलिसांना गुंगारा देतोय. पण त्याचा सख्खा भाऊ, विजय गंगणे, मात्र थेट पोलीस स्टेशनमध्ये, साक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या (API) एसी केबिनमध्ये बसून गप्पा छाटताना सापडलाय! बोला!
ही ‘स्कूप’ बातमी फोडली आहे आपले जागरूक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी. ५ मेच्या सायंकाळी, माने यांना पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी वेगळंच शिजत असल्याचा वास आला. डोकावून बघतात तर काय, फरार विनोदचा भाऊ विजय चक्क सपोनि गोकुळ ठाकूर यांच्यासोबत हास्यविनोदात रमलेला! माने भाऊंनी लगेच ठाकूर साहेबांना फोन लावला, “काय साहेब, फरार आरोपीच्या भावाला डायरेक्ट केबिनमध्ये एन्ट्री? चहा-पाणी की आणखी काही?”
आता माने यांचा आरोप पण गंभीर आहे. ते म्हणतात, “अहो, हा विजय गंगणे म्हणजे नुकत्याच पकडलेल्या रणजित पाटीलचा बोका आणि त्यांचा आका वेगळा ! जरा पाटीलचे कॉल रेकॉर्ड तपासा, विजयभाऊ पण आत सापडतील. फरार माणसाच्या भावाला अशी व्हीआयपी ट्रीटमेंट? म्हणजे पोलीस काय आरोपींना पायघड्या घालतायत का?” माने पुढे विचारतात, “हा विजय गंगणे रोज पोलीस स्टेशनला करतो काय? पोलिसांशी ‘सेटिंग’ लावायला येतो की काय?”
पोलिसांचा ‘थंडगार’ खुलासा:
इकडे बातमी बाहेर पडल्यावर ठाकूर साहेब जरा गडबडले. पत्रकारांनी विचारल्यावर म्हणाले, “अहो, तसं काही नाही. आम्ही विजयला चौकशीसाठी बोलावलं होतं.” पत्रकारांनी लगेच डाव टाकला, “मग नोटीस दिली होती का? दाखवा बघू प्रत?” यावर आपले ठाकूर साहेब एकदम ‘गप्पगार… थंडगार’! जणू काही कनेक्शनच कट झालं!
आणि आता खरी ‘गेम’:
- या प्रकरणात एकूण ३६ आरोपी आहेत म्हणे. १४ गजाआड आहेत, १ नुकताच सापडला. मग उरलेले २१ वीर कुठे गायब झाले? दीड महिना झाला, पोलीस काय त्यांना शोधायला मंगळावर गेलेत की काय?
- ठाकूर साहेब म्हणतात विजयला चौकशीला बोलावलं. मग विचारलं का त्याला, “अरे बाबा, तुझा फरार भाऊ विनोद कुठे लपलाय?”
- अशी पण बातमी आहे की, फरार विनोद भाऊ त्याच्या भावाच्या, म्हणजे विजयच्याच, फोन-पे वरून पेमेंट करून ड्रग्ज मागवायचा. मग त्यावेळी विजय भाऊ काय करत होते? झोपले होते का?
- डिसेंबर २०२३ मध्ये विनोदला ऍडमिट केलं होतं म्हणे. मग विजयने पोलिसांना का नाही कळवलं? की कळवून पण पोलीस ‘गोट्या खेळत’ बसले?
- सगळ्यात मोठा प्रश्न: गुन्हा दाखल होऊन इतके दिवस झाले तरी पोलीस फरार आरोपींना का पकडत नाहीत? कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे की अजून काही गौडबंगाल?
मंडळी, तामलवाडी पोलीस स्टेशनमधला हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहता, तपास नेमका कुठे चाललाय, देवच जाणे! तोपर्यंत आपण पॉपकॉर्न घेऊन बघत बसूया!