धाराशिव: तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार तामलवाडी टोलनाक्यावर सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) हर्षल डाके यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या टोलनाक्यावर थांबणारी वाहने आरटीओची नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आरटीओच्या नावाने ही ‘अधिकृत’ लूटमार करणारे नेमके आहेत तरी कोण? हा प्रश्न आता सामान्य नागरिक आणि भाविक विचारत आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत श्री. डाके यांनी खुलासा केला की, आरटीओची फिरती पथके जिल्ह्यात सर्वत्र फिरत असतात आणि ती एका ठिकाणी कायमस्वरूपी थांबत नाहीत. तुळजापूरला येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास दिला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या खुलाशानंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर ती वाहने आरटीओची नाहीत, तर मग कुणाची?
आरटीओने हात झटकल्यानंतर, तामलवाडी टोलनाक्यावर अनधिकृतपणे वाहने अडवून वसुली करणारे हे लोक कोण आहेत, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, ही वाहने ‘झीरो पोलिसांची’ असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ‘झीरो पोलीस’ ही संकल्पना नेमकी काय आणि त्यांना हा ‘वसुली’चा अधिकार कोणी दिला, याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल.
भाविक आणि नागरिकांची लूट थांबणार कधी?
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. मात्र, टोलनाक्यावर अशा प्रकारे त्यांची अडवणूक करून आर्थिक पिळवणूक केली जात असेल, तर जिल्ह्याच्या प्रतिमेला काळिमा फासला जात आहे. ही केवळ भाविकांचीच नव्हे, तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची उघड लूट आहे.
तामलवाडी पोलीस काय करतात?
सर्वात गंभीर प्रश्न उपस्थित होतो तो स्थानिक तामलवाडी पोलिसांच्या भूमिकेवर. त्यांच्या हद्दीत येणाऱ्या टोलनाक्यावर जर अशा प्रकारे राजरोसपणे वसुली सुरू असेल, तर ते नेमकी कोणती जबाबदारी पार पाडत आहेत? त्यांच्या नाकावर टिच्चून ही ‘अंधेरगर्दी’ सुरू असताना पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे? की याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे?
आरटीओच्या खुलाश्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तामलवाडी टोलनाक्यावर काहीतरी काळेबेरे शिजत आहे. आता जिल्हा पोलीस प्रशासनाने स्वतःहून पुढे येऊन या ‘झीरो पोलिसांचा’ आणि त्यांच्या म्होरक्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा ‘सरकारी पाठीराख्यां’शिवाय सामान्य माणसाची अशी लूटमार शक्य नाही, या जनतेच्या संशयाला अधिक बळकटी मिळेल.