धाराशिव : राज्यात महायुतीचे सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या काळात भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीपेक्षा कामांना ‘स्थगिती’ मिळवण्यासाठीच आपली सर्व शक्ती पणाला लावली. त्यामुळे जिल्ह्यात वर्षात फक्त स्थगिती दिसली, पण प्रगती काही दिसेना, असा थेट आणि आक्रमक पलटवार शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर केला आहे.
जाधवर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपच्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “दरवर्षी कृष्णा मराठवाडा प्रकल्प आता पूर्ण झाला, असे सांगितले जाते. मात्र, वस्तुस्थितीपासून भाजप कसा पळ काढतंय, हे आज पुन्हा एकदा दिसून आले,” अशी टीका जाधवर यांनी केली.
तुळजाभवानी मातेच्या ठेवीला हात लावला!
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचा मुद्दा उपस्थित करताना जाधवर म्हणाले की, “तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपये मंजूर झाल्याच्या गप्पा मारल्या गेल्या, पण प्रत्यक्षात एक रुपयाही अजून आलेला नाही. उलट, आजवर संस्थानाच्या ज्या ठेवींना कधीही कोणी हात लावला नव्हता, त्या ठेवी मोडून सध्याची कामे करण्याचे पाप भाजपने केले आहे.”
कामांची यादी म्हणजे हनुमानाचे शेपूट
धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, हे महाविद्यालय महाविकास आघाडीने मंजूर केले होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत यांचे सरकार असूनही त्यांना एक वीटही रचता आलेली नाही. टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा मुद्दाही असाच लटकला असून, तिथेही कोणतेच रचनात्मक काम झाले नाही. भाजपच्या कागदावरील कामांची यादी म्हणजे ‘लांबत जाणारी हनुमानाची शेपटी’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
एकमेकांची जिरवण्यातच धन्यता
“ज्याप्रमाणे स्थगिती आणण्यासाठी भाजप नेत्यांनी शक्ती वापरली, तशी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरली असती तर जनतेचे भले झाले असते. मात्र, महायुतीचे घटक पक्ष एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानत असतील, तर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा तरी कशी करणार?” असा सवाल तानाजी जाधवर यांनी उपस्थित केला आहे.






