धाराशिव: आगामी परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी परंडा नगरपरिषदेसाठी ‘एकला चलो’ ची भूमिका जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकीकडे महायुती एकसंध असल्याचा दावा केला जात असतानाच सावंत यांनी घेतलेली ही वेगळी भूमिका थेट भाजप आमदार राणा पाटील यांच्यासोबतच्या वादातून पुढे आल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे भाजप आमदार राणा पाटील हे मुंबईत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक घेऊन महायुती एकसंध असल्याचा दावा करत आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच पक्षाचे (शिवसेना शिंदे गट) नेते तानाजी सावंत यांनी परंड्यासाठी स्वबळाचा नारा दिल्याने मोठा विरोधाभास निर्माण झाला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील शिवसेना शिंदे गटाचेच नेते आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रीपद गेल्यापासून आमदार तानाजी सावंत हे नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. गेल्या तीन जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकांना त्यांनी लावलेली अनुपस्थिती हीदेखील त्यांच्या नाराजीचीच परिणती मानली जाते. हाच असंतोष आता परंडा नगरपरिषदेच्या निमित्ताने उफाळून आला आहे.
सावंत यांच्या या ‘एकला चलो’ च्या घोषणेमुळे परंडा नगरपरिषदेत महायुतीचे अधिकृत गणित बिघडण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या मित्रपक्षांमधील हा उघड संघर्ष महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
View this post on Instagram





